रजोनिवृत्ती - भाग 1
- डॉ. वर्षा चिपळूणकर- ओक (स्त्रीरोगतज्ज्ञ.)
नुकताच येऊन गेलेला ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट सुपरहिट झाला. कित्येक स्त्रियांना यातील वेगवेगळ्या पात्रांमध्ये स्वतः चे आयुष्य दिसले. यातील चारू हे पात्र जाहीरपणे’menopause’ म्हणजे पाळी बंद होणे (रजोनिवृत्ती) या विषयावर जाहीर भाष्य करते. काही स्त्रियांना ते पटले तर काहींना असं वाटलं की त्यात काय बोलायचय? आणि तेही सगळ्यांसमोर? यातील चित्रपटाची नाट्यमयता बाजूला ठेवली तर आपल्या देशात खरोखर किती स्त्रियांना menopause बद्दल बोलायची किंवा डॉक्टर कडे जायची गरज वाटते? वास्तविक पाहता menopause च्या काळात 80 ते 85 टक्के स्त्रियांना विविध प्रकारचे त्रास होतात. बऱ्याच जणींना याकडे लक्ष न दिल्यामुळे काही दूरगामी परिणाम पण होतात. ऑक्टबर महिना हा जागतिक menopause दिन mhanun साजरा केला जातो. त्या निमित्ताने या विषयावर आपण थोडे बोलूया. गरोदर नसलेल्या एखाद्या स्त्री ला जर पूर्ण 12 महिने पाळी आली नाही तर त्याला वैद्यकीय परिभाषेत menopause म्हणतात. Menopause साधारण वयाच्या ज्या टप्प्यावर येतो त्याला इंग्रजी मध्ये midlife असा एक छान शब्द आहे. म्हणजे हा स्त्री च्या आयुष्याचा मध्य असतो, शेवट नव्हे. यादरम्यान स्त्रियांना काही तात्पुरत्या स्वरूपाचे त्रास होऊ शकतात. काहींना पाळी अनियमित होण्याचा किंवा अती रक्तस्त्राव होण्याचा त्रास होतो. काहींना अचानक कुठल्याही ऋतूत घाम फुटतो ( hot flushes). आणि हा त्रास इतका अस्वस्थ करतो की रात्रीची झोप सुद्धा नीट लागत नाही. काहींना स्वभावात अचानक बदल जाणवतात. अचानक राग येतो किंवा उदास वाटते. काही वेळा हे बदल त्या स्त्री ला व तिच्या घरच्यांना फारच त्रासदायक होतात. हे सर्व जरी तात्पुरते त्रास असले तरी त्याच्यावर अगदी साधे सोपे इलाज किंवा औषधे उपलब्ध आहेत. आता काही स्त्रिया असे म्हणतात की यातील कुठलाच त्रास मला फारसा होत नाही. तर मी डॉक्टर कडे कशाला जायचं? तर या वेळी जे काही शारीरिक बदल होतात त्यातील काही दूरगामी परिणाम करणारे असतात. जसे की menopause नंतर हाडांचा ठिसूळपणा वाढतो आणि त्याचा परिणाम प्रत्येकच शारीरिक हालचाली वर होऊ शकतो. तसंच menopause नंतर estrogen या हार्मोन चे हृदयाला मिळणारे सुरक्षा कवच कमी होते. त्यामुळे पन्नाशीच्या आतील स्त्रियांना heart attack येण्याचा धोका पुरुषापेक्षा कमी असतो. पण menopause नंतर मात्र हा धोका वाढतो. स्त्री च्या शरीरातील संप्रेरके ( हॉर्मोन्स) बदलल्यामुळे मेंदूच्या कार्यातही काही बदल होतात. हे सर्व मात्र कायमचे बदल आहेत. आणि त्यापासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी जीवनशैलीत काय बदल करता येतील किंवा कुठली औषधे घेता येतील हे तुमचे स्त्रीरोगतज्ञ सांगू शकतात. तर आज आपण menopause दरम्यान चे बदल आणि त्यासाठी डॉक्टर कडे जायची गरज याबद्दल बोललो आता पुढच्या वेळी या प्रत्येक तक्रारी बद्दल आणखी माहिती घेऊया. क्रमशः
Dr. Varsha Chiplunkar- Oak. (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ)